आजपासून - पुरुषोत्तम अंतिम फेरी !
प्राथमिक झाली - नाटकाचा पुन्हा नव्याने विचार सुरु झाला - परीक्षकांशी भेटी-गाठी झाल्या - नाटक कुठे कमी पडते आहे ह्यावर चर्चा झाली - मधेच गणपतींचे आगमन झाले - पावसाचा भडीमार मधून मधून सुरूच होता - बाहेरगावच्या कलाकारांना गणपतींसाठी त्यांच्या गावी जायचं होतं - प्राथमिक आणि अंतिम फेरी मध्ये १७ दिवसांचे अंतर होते - ह्या सर्व घडामोडींना ओलांडून आजपासून पुन्हा पुरुषोत्तम अंतिम फेरी सुरु होत आहे !
प्रत्येक टीम ने नाटक अधिक चांगले होण्यासाठी नक्कीच बदल केले असतील. ह्या बदलांसाठी असलेला कालावधीही मोठा असल्याने - एरवी अवघड वाटणारी नाटकात सुयोग्य बदल करण्याची हि गोष्ट साध्यहि झाली असेल ! १७ दिवसांनतर आलेल्या अंतिम फेरीमुळे प्रत्येक नाटकाबद्दल आणि विशेषतः त्यातल्या बदलांबद्दल कमालीची उत्सुकता आहे ! प्रत्येकाला आपापली बलस्थाने आणि कमकुवत बाजू माहिती आहेत - तसेच फायनल मधल्या नाटकांचे प्रयोग कोणत्या लॉट मध्ये कोणत्या क्रमाने येतात - याचाही विचार महत्वाचा ठरेल.
प्रत्येक नाटकाच्या कमी-जास्त बाजू थोडक्यात बघुयात !
१) अनामिक ( AISSMS ) - मला हे नाटक प्राथमिक मध्ये कळलेच नव्हते - म्हणजे मला ह्या नाटकाचे आकलन प्राथमिक मध्ये झालेलेच नव्हते - त्यामुळे ह्या नाटकावर मी फार बोलू शकणार नाही . पण कदाचित - जी ए कुलकर्णींच्या कथेतला आशय - ठळकपणे बाहेर येत नाहीये - असे मला वाटते. पण - कदाचित नाटकाच्या दिग्दर्शकाला जे मांडायचे आहे ते त्याने ताकदीने मांडलेलेही असू शकते - कदाचित माझीच आकलन शक्ती कमी पडतीये - हीही शक्यता नाकारता येत नाही.
२) पेशंट ( बी एम सी सी ) - मला सर्वात जास्त आवडलेले नाटक. दिग्दर्शनात खोलात विचार केलेला जाणवतो. मनोव्यापारांचा एक सुंदर अनुभव हे नाटक देऊन जाते. मुख्य पात्राने अजून सरस अभिनय केला तर अधिक चांगला प्रयोग होऊ शकतो. नाटकातल्या प्रथमपुरुषी एकवचनी निवेदन शैलीला - पूर्णपणे नाट्यानुभवात रुपांतरीत केल्यास नाटकातले अनावश्यक प्रसंग जाऊन नाटक अजून सकस होऊ शकेल ! अर्थात प्रथमपुरुषी एकवचनी निवेदन शैली वापरणे हा दिग्दर्शकाचा निर्णय असू शकतो. एकुणात हि एकांकिका करंडकासाठी आणि जयराम पारितोषिकासाठी सशक्त दावेदार ठरू शकते !
३) इमोशनल लोचा ( व्ही आय आय टी ) - नाटकाचा विषय सध्याचा अगदी परवलीचा - हि नाटकाची सर्वात जमेची बाजू. तसेच तांत्रिक बाबींमधील सफाई - हीही जमेची बाजू. प्राथमिक नंतर - सर्वात जास्त सर्वात चांगले बदल जर एखाद्या एकांकिकेत करता येऊ शकत होते - तर ते ह्या एकांकिकेत. विषयाच्या वरवर न राहता खोलात शिरून जर मांडणी केली - तर हे नाटक खूप चांगले होऊ शकते. कलाकारांचा अभिनय साचेबंद चौकटीतून बाहेर पडायला हवा. CHARACTERS निर्माण करण्यात हि एकांकिका कमी पडत होती प्राथमिक मध्ये - त्यावर पकड मिळवल्यास हि एकांकिका सुद्धा करंडकास पात्र ठरू शकते.
४) लॉगिंग आउट ( एम एम सी सी ) - इंटरनेट चे व्यसन - हा सध्याचा विषय ! पात्रांचे सुरुवातीचे संवाद खूप जास्त निवेदनात्मक - वर्णनात्मक आणि अनावश्यक वाटतात. दोघेही कलाकार काम चांगले करतात - पण मुलगी सरस - अर्थात मुलाला म्हणावी तशी 'भूमिका' च नसल्याने - त्याकडून जास्त अपेक्षा करू शकत नाही. नेपथ्य चांगले. नाटकाची तीव्रता बाहेर पडत नाही - हि नाटकाची कमकुवत बाजू. गेल्या १७ दिवसांमध्ये ह्या बाबींवर हवे ते बदल झाले असावे अशी अपेक्षा आहे.
५) दुमला ( सिंहगड अभियांत्रिकी अकादमी ) - कथेतला वेगळेपणा , सर्वांचा उत्तम अभिनय - मनोव्यापारांच्या मध्ये फुलणारे नाट्य - आणि उत्तम सादरीकरण - ह्या नाटकाच्या जमेच्या बाजू ! तांत्रिक बाबींमध्ये अजून सफाई अपेक्षित आहे - त्यातही पार्श्व संगीताच्या आवाजाच्या पातळीमध्ये बदल करणे गरजेचे आहे - पात्रांमध्ये घडणारे नाट्य - नक्की कोणत्या शतकात घडते आहे ह्यावर बारकाईने विचार होणे गरजेचे वाटते.
६) हे देअर देलायलाह ( एस सी ओ इ ) - दणकेबाज - विनोदी ढंगाचे सादरीकरण - चांगला अभिनय - चांगले पार्श्व संगीत - आणि 'गमतीदार' ( ?? ) मांडणी - ह्या नाटकाच्या जमेच्या बाजू. नाटकातल्या मूळ विचाराच्या मधला वरवरपणा - यावर विचार होते खूप गरजेचे आहे.
७) सिरीयल किलर्स ( एम आय टी सी ओ ई ) - विषयाच्या अजून खोलात शिरणे गरजेचे आहे. प्राथमिक मध्ये नाटक फक्त प्रसंगान्पुरातेच मर्यादित राहत होते. नाटकातला आशय प्रसंगांच्या कक्षा ओलांडून बाहेर येणे गरजेचे वाटते !
८) चेकमेट ( सी ओ ई पी ) - Non linear treatment ( w.r.t time line ) - हे नाटकाचे वैशिष्ट्य ! पण प्राथमिक मध्ये नाटक या वैशिष्ट्या पर्यंतच मर्यादित राहत होते - नाटक त्यापलीकडे जायला हवे. प्राथमिकला 'अप्रतिम घड्याळाचे नाटक ' ह्या शिक्क्यातून नाटक बाहेर पडावे अशी अपेक्षा !
९) अन्वय ( कमिन्स कॉलेज ऑफ इन्जिनिअरिन्ग ) - द लास्ट लीफ - ह्या कथेचे केलेले उत्तम नाट्यरुपांतर , मुख्य पात्रांचा उत्तम अभिनय - दिग्दर्शनातले बारकावे - चांगले नेपथ्य - आणि सर्वच कलाकारांचा खणखणीत आवाज - ह्या नाटकाच्या जमेच्या बाजू. पण नाटक माणसाच्या प्रवृत्तीन्पर्यंत जाण्यात कमी पडते - त्यामुळे शेवटी फक्त कथेचे उत्तम नाट्य रुपांतर एवढेच लक्षात राहते - इथे बदल करणे गरजेचे आहे.
सर्वच स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा ! भारत नाट्य मंदिर चा रंगमंच कलाकारांच्या अप्रतिम अदाकारीने नाहून निघू देत - अशी देवाकडे प्रार्थना ! तसेच ह्या अप्रतिम सोहळ्याला - स्पर्धेच्या निकालानंतर कोणतेही गालबोट न लागो अशीही प्रार्थना !
स्पर्धेचा निकाल काहीही लागो - आपण तो खिलाडू वृत्तीने स्वीकारुयात ! शेवटी स्पर्धा आपली आपल्याशी - आणि जर असे असेल तर निकाल काहीही लागला तरी त्याचे दुख्ख किंवा वाजवीपेक्षा जास्त कौतुक कशाला ! :-)